चालू घडामोडी : १० जून २०२१

भारतीय अमेरिकी मुलीस संशोधनासाठी पुरस्कार

भारतीय अमेरिकी विद्यार्थिनी सोही संजय पटेल हिला १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेच्या परिणामांमुळे प्रेरित होऊन केलेल्या संशोधनास प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.तिला ‘पॅट्रिक एच हर्ड शाश्वतता पुरस्कार २०२१’ जाहीर झाला आहे.
रिजेनेरॉनच्या आंतरराष्ट्रीय आभासी विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. तिचा प्रकल्प हा वनस्पतींच्या मदतीने पॉलियुरेथिनसारखा फोम तयार करण्याबाबत असून त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत.
सोही हिच्या संशोधन प्रकल्पाचे नाव ‘स्केलेबल अँड सस्टेनेबल सिंथेसिस ऑफ नॉव्हेल बायोबेस्ड पॉलियुरेथिन फोम सिस्टीम’ असे असून त्यात पर्यावरणस्नेही पदार्थांचा वापर करण्यात आला आहे.
तिने दोन बिनविषारी उत्पादने टाकाऊ कचऱ्यापासून तयार केली आहेत, त्यापासून पॉलियुरेथिन तयार करता येते. पर्यावरण विज्ञान संस्थेच्या सल्लागार डॉ. जेनिफर ऑर्मी झॅवॅलेटा यांनी सांगितले, की यंदाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात जे प्रकल्प सादर करण्यात आले ते पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहेत.

महाराष्ट्र पेपरलेस वाहनाची नोंदणी करणारे चौथे राज्य

महाराष्ट्राने वाहनांची नोंदणी प्रक्रिया फेसलेस आणि पेपरलेस केली आहे. असे करणाऱ्या दिल्ली, राजस्थान आणि ओडिशानंतर चौथे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी फेसलेस आणि पेपरलेस वाहन नोंदणी प्रक्रियेचा आदेश जारी केला आहे.

उत्तरप्रदेशचे निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णीWhatsApp Image 2021 06 09 at 11.51.36 AM

उत्तरप्रदेशचे माजी आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची काल निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी संपला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं.
तीन अधिकारी असलेल्या निवडणूक आयोगाच्या या पॅनेलमध्ये सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर राजीव कुमार हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. अनुप चंद्र पांडेय हे नियुक्तीनंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.
१९८४च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. अनुप चंद्र पांडेय यांनी यापूर्वी २०१८ मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता. या पदावरुन ते फेब्रुवारी २०१९ मध्ये निवृत्त होणार होते. मात्र, योगी सरकारने केंद्राच्या परवानगीने त्यांचा कार्यकाल सहा महिन्यांनी वाढवला. ऑगस्ट २०१९ मध्ये निवृत्त होण्याआधी पांडेय उत्तरप्रदेशात इन्फ्रास्ट्रक्चर आणि औद्योगिक विकास आय़ुक्त म्हणून कार्यरत होते.
अनुप चंद्र पांडेय यांनी मेकॅनिकल इंजिनियरींग केलं आहे. बी. टेकच्या पदवीसोबतच त्यांना एमबीएची पदवीही प्राप्त झालेली आहे. त्यांनी प्राचीन इतिहास या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाल साधारण तीन वर्षांचा असेल. त्यांचा कार्यकाल फेब्रुवारी २०२४मध्ये समाप्त होईल.