येत्या आठवड्यात 18000 पोलीस भरतीची जाहिरात काढणार : उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र शासनामार्फत पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. शनिवारी देशभरात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे. 

महाराष्ट्रातही आगामी काळात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. या अनुशंगाने १८ हजार पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

दीपोत्सवाच्या पर्वावर रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर येथे २१३ युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास ३८ विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे.

दरम्यान,यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात 10 लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे. राज्य शासनालाही अशावेळी मैदानात उतरावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलीस दलामध्ये तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाईल, असे घोषित केले.

See also  PDKV डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘या’ पदांची भरती : वेतन ६७ हजारापर्यंत